मुंबई - मुंबईत गेले अकरा महिने केलेल्या प्रयत्नामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले. मात्र रेल्वे प्रवासाची मुभा आणि सर्वत्र होणारी गर्दी यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईत बोरिवली, मुलुुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. मुंबईमध्ये मुलुंड, बांद्रा, गोरेगाव, चेंबूर, भांडूप आणि ग्रांट रोड या विभागात सर्वाधिक इमारती आणि त्यामधील मजले सील करण्यात आल्या आहेत.
1305 इमारती सील -
मुंबईत 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिकेने कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या 1305 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. त्यात 71 हजार 838 घरे आहेत. त्यात 2 लाख 75 हजार 151 नागरिक राहतात. त्यात 2749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुलुंडमध्ये सर्वाधिक रुग्ण -
मुलुंडच्या टी विभागात सर्वाधिक 514 रुग्ण असून या विभागातील 233 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. बांद्रा पश्चिम एच वेस्ट विभागात 244 रुग्ण असून या विभागातील 97 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. गोरेगाव पी साऊथ येथे 237 रुग्ण असून या विभागातील 125 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. चेंबूर एम वेस्ट विभागात 230 रुग्ण असून या विभागातील 105 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. भांडुप पवई विक्रोळीच्या एस विभागात 227 रुग्ण असून या विभागातील 33 इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. ग्रांट रोड डी विभागात 190 रुग्ण असून या विभागातील 110 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
मुलुंडमध्ये सर्वाधिक इमारती सील -
सर्वाधिक सील इमारती या मुलुंडच्या टी विभागात आहेत. मुलुंडमध्ये 233, पी साऊथ 125, घाटकोपर एन विभागात 125, ग्रांट रोड डी विभागात 110, बोरिवली आर सेंट्रल 106, चेंबूर एम वेस्ट विभागात 105 तर वरळीच्या जी साऊथ, सायन माटुंगाच्या एफ नॉर्थ विभागात एकही इमारत सील करण्यात आलेली नाही. कुर्ला एल वॉर्ड विभागाच्या हद्दीत एकच इमारत सील करण्यात आली आहे. सी विभागात 5 तर जी नॉर्थ या विभागात 7 तर पी नॉर्थ विभागात 7 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
काय आहेत नियम -
कोरोनाच्या सुरुवातीला रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जायची. या नियमात बदल करण्यात आला आहे. एका इमारतीत 5 रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जाते. एखाद्या इमारतीच्या मजल्यावर रुग्ण आढळून आल्यास तो मजला सील करण्यात येतो. अशा सील इमारतीमधील रहिवाशांना १४ दिवस इमारतीबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून खाणे-पिणे, कामधंंदा, नोकरी त्यांना आता वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून करावे लागणार आहे. स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्याविरोधात ही कारवाई अशीच सुरू राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.