महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील शाळा सप्टेंबरपासून होणार सुरू; शिक्षणमंत्र्यांची माहिती - सप्टेंबरपासून शाळा सुरू

राज्यातील शाळांची सुरुवात ही टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन केली जाणार आहे, तर दुसरीकडे आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या शाळा तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

minister varsha gaikwad
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

By

Published : Aug 4, 2020, 3:45 PM IST

मुंबई- राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज 'ई टीव्ही भारत' शी बोलताना दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात सुरू असल्याने १५ जूनपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांत राज्यातील शाळांना प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. सर्व ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, आता राज्यात ज्या भागांमध्ये कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव नाही, अशा भागांमध्ये प्रामुख्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यात सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षे रखडले जाईल की काय अशी पालकांमध्ये भीती व्यक्त केली जात होती. त्याला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागांमध्ये कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी असल्याने या भागातील शाळा सुरू करण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, केंद्र सरकारने आक्षेप घेतल्याने आम्हाला त्या थांबवाव्या लागल्या होत्या. मात्र, आता राज्यातील अनेक भागात परिस्थिती सुधारत असल्याने आम्ही या शाळा सुरू करणार असल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शाळांची सुरुवात ही टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन केली जाणार आहे, तर दुसरीकडे आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या शाळा तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यात पहिल्या टप्प्यात नववी, दहावी आणि बारावी, तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवीपर्यंच्या शाळा सुरू केल्या जातील. सर्वात शेवटी पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जातील. मात्र, त्यासाठी त्या दरम्यानच्या संपूर्ण परिस्थितीचा विचार करूनच त्यावर निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. प्रत्येक शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विदर्भातील शाळा या सर्वात उशिराने सुरू होतात. त्या काळात या भागात खूप ऊन असल्याने शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच कोरोनामुळे विदर्भातील काही ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये ऑगस्टपासूनच शाळा सुरू करण्याचे विधान मदत व पूनवर्सन मंत्री विजय वडट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. आज त्या सुरू केल्या जाणार होत्या. परंतु राज्यभरातील पावसाचा जोर वाढल्याने या शाळा येत्या काही दिवसांत सुरू केल्या जाणार असल्याची माहितीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details