मुंबई -मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. खासगी शाळांचा सामना करण्यासाठी पालिकेच्या शाळांना नवा साज दिला जात आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्षे शाळा बंद असल्या तरी हे काम सुरु होते. शाळांना नवा साज दिल्याने विद्यार्थी संख्येत वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पालिकेच्या शाळा कात टाकतायत -मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पुरवणे त्याचसह शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळा असून स्वतःच्या मालकीच्या ४६७ शालेय इमारती आहेत. यात ३ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांची अवस्था आणि देण्यात येणारे शिक्षण यामुळे गेल्या काही वर्षापर्यंत शिक्षणाचा दर्जा घसरला होता. मात्र त्यानंतर पालिकेने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. पालकांचा आणि विद्यार्थ्यांना ओढा इंग्रजी शाळांकडे असल्याने पालिकेच्या शाळेकडे वळवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या. सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई, आयबी बोर्डाच्या शाळा सुरु केल्या आहेत. त्याला पालक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पालिका शाळांना नवा साज -पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा मिळाव्यात यासाठी शालेय इमारतींच्या मोठ्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी केली जात आहे. पालिकेच्या शाळांचे 'मुंबई पब्लिक स्कुल' असे नामकरण करण्यात आले आहे. सर्व शाळांना एकच रंग देण्यात येत आहे. शाळांवर पालिकेचे लोगो लावण्यात येत आहेत. २०२१ पासून किरकोळ व तात्काळ दुरुस्तीसाठी २ वर्षांसाठी सात झोनमध्ये कंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळांच्या मोठ्या दुरुस्तीसाठी ६८ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामधील २७ कामे चालू आर्थिक वर्षात तर ४१ कामे पुढील आर्थिक वर्षात केली जाणार आहेत. शाळांच्या पुनर्बांधणीची ३५ कामे प्रगतीपथावर असून ३२ कामे पुढील वर्षी केली जाणार आहेत. शाळांच्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी यासाठी पालिकेने ४१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.