मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि दिल्लीमध्ये वाढणारे रुग्ण बघता मुंबईत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नाही. मात्र, १ जानेवारीपासून शाळा सुरू करता येऊ शकतात, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे.
शिक्षणमंत्र्यांचा आदेश -
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्चपासून सर्व व्यवहार बंद झाले. शाळाही बंद झाल्या. इतकेच नव्हे तर, दहावीचा एक पेपरही रद्द करण्यात आला. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील, असे नुकतेच सांगितले होते. मात्र आता पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.