महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत आजपासून शाळा सुरू.. विद्यार्थ्यांनी शाळेत कोरोना नियमांचे पालन करावे - महापौर किशोरी पेडणेकर - मुंबईतील शाळा पुन्हा सुरू

मुंबईमध्येही आजपासून ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पालकांनी संमतीपत्र सादर केल्यानंतरच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

mayor-kishori-pednekar
mayor-kishori-pednekar

By

Published : Oct 4, 2021, 5:27 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आल्याने आजपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्येही आजपासून ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पालकांनी संमतीपत्र सादर केल्यानंतरच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

महापौरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद -

बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस माध्यमिक शाळा तसेच बीडीडी चाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका शाळा संकुलाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कोविड-१९ च्या प्रादुर्भावानंतर पुनश्च शाळा सुरु झाल्यानंतर भेट दिली, त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. याप्रसंगी पालिकेचेसह आयुक्त शिक्षण अजित कुंभार, उपशिक्षणाधिकारी संजीवनी कापसे तसेच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पंचवीस विद्यार्थ्यांना प्रवेश -

महापौर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र शासन, टास्कफोर्स यांची मान्यता घेऊन तसेच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. २ ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण शाळांचे निर्जंतुकीकरण केले असून त्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. शंभर टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली असून एका बेंचवर एक याप्रमाणे फक्त पंचवीस विद्यार्थ्यांना त्या - त्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्यासोबतच शाळेत न येणाऱ्या मुलांसाठी ऑनलाईन वर्गाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे.

हे ही वाचा -अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 'ज्ञानपीठ' उघडले; नागपुरातील २२५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट



दिवसाआड या पद्धतीने प्रवेश -

प्रत्येक विद्यार्थ्याचे दैनंदिन तापमान नोंदविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. तसेच २५ विद्यार्थी क्षमतपेक्षा जास्त विद्यार्थी झाल्यानंतर आज ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश न देता एक दिवसाआड या पद्धतीने प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडावरचा मास्क काढू नये तसेच आपले दप्तर घरी गेल्यानंतर निर्जंतुकीकरण करून घेण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले. तसेच विद्यार्थ्यांना आखून दिलेल्या नियमाप्रमाणे शाळेत प्रवेश करणे तसेच प्रवेश केल्यानंतर आपले नाव व नंबर असलेल्या बेंचवर बसावे असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

नियम पाळण्याच्या सूचना -

विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ साबण बाळगणे आवश्यक असून साबणाने हात निर्जंतुकीकरण केल्यानंतरच पिण्याचे पाणी प्यावे, प्रत्येक वर्ग खोलीमध्ये विद्यार्थ्यांचे नावांची यादी लावण्यात आली असून तसेच नियम पाळण्याच्या सूचना याचे ठिकठिकाणी स्टिकर लावण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर सहकाऱ्यांना मिठी मारू नये तसेच टाळी देऊ नये. त्यासोबतच स्वच्छ, सुंदर शाळेमध्ये प्रकृती स्वास्थ्य चांगले असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

हे ही वाचा -शाळा सुरु करण्याचा निर्णय आव्हानात्मक; मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद



आठवड्यातून तीन दिवस निर्जंतुकीकरण -

शाळेसोबत आरोग्य केंद्र संलग्न करण्यात आले असून विद्यार्थ्यांना काही त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने आपल्या शिक्षकांना सांगावे, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. तसेच ज्या पालकांची प्रवासाची समस्या आहे त्या पालकांबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून त्यांना रेल्वेची पास कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच मुले एकत्र खेळणार नाही, डब्बा आणणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच शाळेची इमारत आठवड्यातून तीन दिवस निर्जंतुकीकरण करून घेण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

असे आहेत नियम -
- आपले दप्तर भरताना शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली जरुर भरा.
- शाळेत जाण्यासाठी तयार होताना तोंडावर मास्क घालणे विसरू नका. शाळा घराजवळ असेल तर चालत किंवा सायकलने जा. बसने जाताना एका सीटवर एकाच विद्यार्थ्याने बसावे, पूर्ण वेळ मास्क वापरा. शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर पाळा.
- शाळेत येताना शाळेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजू द्या.
- वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करा.

- नेमलेल्या बाकांवरतीच बसा, मित्रांसोबत जागेची अदलाबदल करू नका.

ABOUT THE AUTHOR

...view details