मुंबई -गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. यासाठी शाळा प्रशासनाने देखील स्वच्छता आणि सॅनिटझर करण्यासाठी सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू होत असल्यामुळे आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सरकारच्या वतीने दिलेल्या नियमाचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहे. काही विद्यार्थी एक दिवस तर काही विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत येणार आहेत. जे विद्यार्थी घरी असतील त्यांना ऑनलाइन शिक्षण देखील दिले जाणार आहे. याविषयी चेंबूर येथील लोकमान्य टिळक शाळेतून ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी आढावा घेतला आहे.
आठवी ते बारावीचे वर्ग पहिल्या टप्प्यात -
जवळपास दीड वर्षाच्या अंतरांनंतर शाळा पून्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे राज्यातील शाळा बंद आहेत. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
'फिजिकल डिस्टन्सवरच विद्यार्थी बसण्याची सोय'
राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरणार आहेत. तसेच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असेल. पालकांनी आपल्या पाल्याला बिनधास्त शाळेत पाठवावे. शाळेतील प्रत्येक वर्गखोली स्वच्छ धुऊन पुसून सॅनिटायझर केलेली आहे. वॉशबेसिनमध्ये हॅण्डवॉश आहेत. फिजिकल डिस्टन्सवरच विद्यार्थी बसण्याची सोय आहे. आमच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसी घेतल्या आहेत. खूप आनंद होत आहे एवढे अंतराने शाळा सुरू झाल्या आहेत. असे टिळक नगर येथील लोकमान्य टिळक हायस्कूलचे सचिव सुहास मराठे यांनी सांगितले.
काय आहे नियमावली -
- एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.
- शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल.
- सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.
- शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.
- शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असेल.
- मास्क घालणे अनिवार्य असेल.
- शाळेत सॅनिटायजरचा वापर करणेही गरजेचे आहे.
हेही वाचा -शाळा उघडणार, शिक्षकांच्या मनात आशेचा किरण! पण कोरोना काळात आली वाहनं चालवण्याची वेळ