मुंबई - राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने ( Mahavikas Aghadi ) प्रयत्न चालवले असले तरी ते तातडीने देणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने ओबीसी समाजाला दिलासा देण्यासाठी आता विविध योजनांचा आधार घेतल्याचे दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसींना घर ( OBC community ) दिलासा देण्यासाठी सावित्रीबाई फुले आवास योजना ( Savitribai Phule Awas Yojana) प्रस्तावित करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारच्या तंबूत खळबळ माजली आहे. राज्य सरकारने नेमलेल्या जयंत बांठीया आयोगाकडून अद्यापही इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मात्र, ओबीसी समाज नाराज होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध प्रयत्न करताना दिसत आहे.
अनुसूचित जाती जमातीच्या धर्तीवर आता ओबीसी समाजासाठी ही घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर ती लागू करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्ग विभागातील सचिवांनी दिली आहे. एकूणच इतर मागासवर्ग समाजातील लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आखताना आणि त्यासाठी तरतूद करताना दिसत आहे.
इतर मागासवर्ग महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये वाढ करून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त अर्थसाह्य करण्याचा सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने इतर मागासवर्ग महामंडळाच्या भाग भांडवलात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामंडळाचे 250 कोटी रुपये असलेले भाग भांडवल आता 500 कोटी रुपये करण्यात आले आहे.
- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळाच्या भांडवलातही वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामंडळाचे भाग भांडवल 200 कोटी रुपयांवरून पाचशे कोटी रुपये करण्यात आले आहे.