मुंबई - राज्याच्या गृहरक्षक दलाचा नवीन पदभार स्वीकारणारे परमबीर सिंग यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. 100 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी क्राइम ब्रांचमधल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत त्यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंग यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर परमबीर सिंग यांची पत्नी सविता सिंग या स्वतः 6 कंपन्यांच्या संचालक पदावर असून यामध्ये दोन कंपन्या या इंडिया बुल्सशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -परमबीर सिंह भाजपचे दलाल; राष्ट्रवादीचे नागपुरात आंदोलन
हरयाणामधून पदव्युत्तर शिक्षण
हरयाणामधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठातून सविता सिंग यांनी एलएलबीची पदवी घेतली होती. त्या खेतान अँड कंपनीच्या भागीदार असून ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. सविता सिंग या इंडियाबुल्स प्रॉपर्टीच्या कंपनीवर संचालकपदावर होत्या. तर येस ट्रस्टी लिमिटेडच्या संचालकपदावर त्यांना ऑक्टोबर 2017मध्ये नेमण्यात आले होते. याबरोबरच सोरील इन्फ्रा रिसोर्सेस या संचालकपदावर त्या राहिल्या असून इंडियाबुल्स एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकपदावरसुद्धा त्या होत्या.