मुंबई - मुंबईच्या विविध भागात मासे पकडण्याच्या जाळीत आणि काटेरी झुडपात साप अडकले होते. त्यांचे प्राण वाचवून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे मौल्यवान काम 'अम्मा केअर फाउंडेशन'च्या माध्यमातून ( Snake life saving foundation ) करण्यात आले आहे.
धामण, घोणस आणि अजगर असे तीन जातीचे साप माशांच्या जाळी आणि काटेरी झुडपात अडकले होते. बोरिवलीच्या गोविंद नगर येथे ( Dhaman Snake in Boriwali ) धामण जातीचा चार फुटी साप मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकला होता. तर कांदिवली येथील चारकोपमध्ये घोणस जातीचा साप काटेरी झुडपामध्ये अडकला होता. या सापांना सोडवून त्यांना नवे जीवदान देण्यात आले आहे. अम्मा केअर फाउंडेशनच्या ( Amma care foundation ) माध्यमातून प्राण्यांना मदत करण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.
मानद वन्यजीव रक्षक सुनीश सुब्रमण्यम यांनी सांगितले की, गेल्या 10 दिवंसात मंबईच्या कांदिवली, बोरिवली या परिसरातून घोणस, दिवड, अजगर आणि धामण जातींच्या विषारी सापांना वाचवण्यात आले. मासे पकडण्याची जाळी किंवा खेळामध्ये वापरण्यात येणारी जाळी ही अधिक तर नायलॉनच्या धाग्यापासून बनलेली असते. यामध्ये अडकलेल्या सापांच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. साप अडकल्याची माहिती मिळताच या सापांना जीवदान देण्यासाठी संबंधित संस्थेचे बचाव पथकाच्या सदस्या निशा कुंजू, सुधमिता दिघे आणि सुनील गुप्ता यांच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या. मुंबईच्या विविध भागातून या सापांना वाचून वनविभागाच्या कर्मचार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून निरिक्षणात ठेवण्यात आले. सापांची आरोग्य स्थिती पूर्ववत झाल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.