मुंबई - नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतीश उके यांची काल मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत, त्यांच्यावर कडाडून टीका सुद्धा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपुर मधील एक मोठे गुंड असून, ते कोणाही विरुद्ध काहीही षडयंत्र रचत असतात. फडणवीस हे कपटी आणि बहुरंगी आहेत, असा आरोप यावेळेस वकील सतिष उके यांनी केला आहे.
फडणवीसांवर कडाडून टिका
"राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर मधील निकटवर्तीय भाजपा पदाधिकारी आणि श्रीराम सेनेचे प्रमुख रणजित सफेलकर यांच्याकडून आर्किटेक एकनाथ निमगडे यांची 2016 साली हत्या करण्यात आली होती. रणजित सफेलकर हे फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मर्जीतले एक टोळी चालवणारे नागपूरमधील गुंड आहेत. नागपुर मधील मोक्याची 300 कोटींची जागा मिळवण्यासाठी हा खून करण्यात आलेला होता. निमगडे यांची हत्या झाली तेव्हा फडणवीस हे गृहमंत्री होते, त्यामुळे रणजित सफेलकर यांना फडणवीस यांनी पूर्णपणे संरक्षण दिले होते". असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सतिष उके यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.