मुंबई : "शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात आहे असे जर एक केंद्रीय मंत्री म्हणत असेल, तर ही गंभीर बाब आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने पाक आणि चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावं" अशी उपहासात्मक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केली. केंद्रीय नेते रावसाहेब दानवे यांनी काल शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा पाठिंबा आहे अशा आशयाचे वक्तव्य केले होते. दानवेंनी एक गंभीर मुद्दा समोर आणला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार असेही राऊत म्हणाले.
दानवेंनी गंभीर मुद्दा समोर आणला; आता राजनाथ सिंहांनी पाक-चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा! सुधारणांची सुरुवात भाजपशासित राज्यांमधून करावी..
सरकारला जर आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा हवी आहे, तर भाजपचे शासन असणाऱ्या राज्यांमध्ये ती लागू करावी. त्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यातून दिसणारे परिणाम पाहून मग इतर ठिकाणी ते लागू करावेत असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला. अशा प्रकारच्या सुधारणा बिहारमध्ये केल्या होत्या. बिहारमधील आजचा धान्याचा भाव ९०० रुपये आहे, तर पंजाबमध्ये साधारणपणे १५०० रुपये आहे. मग बिहारच्या शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी पंजाबला जायचं का? असा सवाल राऊत यांनी व्यक्त केला.
दानवेंचे वक्तव्य गंभीरतेने घ्यायला हवं..
रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आहेत. ते जर असं म्हणत असतील की शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तानचा हात आहे, तर ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यात पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. एक केंद्रीय नेता जर असा आरोप करत असेल, तर नक्कीच त्यांच्याकडे पुरावे असतील. त्यामुळे मी राजनाथ सिंह, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि तीनही दलांच्या प्रमुखांना असे आवाहन करतो की त्यांनी तातडीने चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावी. अशी उपहासात्मक टीका राऊत यांनी केली.