मुंबई - मागील काही दिवस शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) आहेत. हे सर्व आमदार सध्या आपल्या नाराजीचे कारण संजय राऊत यांची विधान व त्यांची भाषा असल्याचं म्हणत आहेत. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेला कंटाळून बंडखोरी केल्याचं हे आमदार ( MLA ) म्हणत आहेत. यावर आता स्वतः शिवसेनेचे नेते ( Shiv Sena leader ) व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत आपल्या निवासस्थानी ( Mumbai Residence ) माध्यमांशी बोलत होते.
गोंधळ करू नका, काय ते कारण ठरवा -यावर बोलताना राऊत म्हणाले की, "त्यांनी नेमकं ठरवावं त्यांनी नेमकी का बंडखोरी केली. जेव्हा ते सुरतला गेले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी निधी देत नसल्याचे कारण दिलं. मग ते सांगायला लागले, आम्ही हिंदुत्वासाठी या सरकारमधून बाहेर पडलो. नंतर सांगायला लागले आमच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक आमच्या विभागात देखील हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करायला लागले. त्यामुळे आम्ही उठाव करत बाहेर पडलो. त्यांनी पक्ष का सोडला बंडखोरी का केली यासाठी त्यांनी स्वतः ची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत. पण, नक्की पक्ष का सोडला त्याचं कारण ठरवा गोंधळ करू नका."
तेव्हा यांचं हिंदुत्व कुठं होतं ? -"2014 साली जेव्हा युती तोडली तेव्हा यातला एकही लोक काही बोलली नाही. तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते. आता अडीच वर्षांनी तुमचं हिंदुत्व जागं झालं का ? संघटनेच्या कामातच मी आहे. पक्षाची भूमिका मांडतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास मला फार क्वचित पाहिला असाल. जिथे संघटनेचे काम असतं, तिथेच तुम्हाला हा संजय राऊत दिसेल. इथल्या एखादा सरकारी कार्यालयात तुम्हाला संजय राऊत ढवळाढवळ करताना दिसला तरी मला दाखवून द्या." असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी बंडखोर गटाला केले आहे.