मुंबई- राज्यात एकीकडे करोनाची स्थिती बिकट होत असताना राज्यात राजकारण तापल्याचं चित्र आहे. सोमवारी रात्री उशिरा मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. तर राजभवनावरील सुरू असलेल्या बैठकीवरून ठाकरे सरकार अस्थिर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'ज्या कुणाला आनंद होतोय त्यांना घेऊ द्या. विरोधी पक्षाला अशा प्रकारचे खेळ खेळू द्या. आम्ही पाच वर्षे पूर्ण करू'; तसेच निवडणूक देखील सोबत लढणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाली. हे मीडियाला कळले नाही. शरद पवार मातोश्रीवर आले. त्यांच्याकडून सरकारच्या भविष्याबद्दल तसेच कोरोनाबद्दल मार्गदर्शन घेतलं, तर कोणालाही वाईट वाटायचं कारण नाही, असं ते म्हणाले. पवार हे उत्तम प्रशासक आहेत. पवार साहेबांनी महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलंय. मोदीही पवारांचं मार्गदर्शन घेत असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या देशातील अनेक मुख्य नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही शरद पवारांशी चर्चा करत असतात. त्यामुळे या बैठकीचा कोणताही वेगळा अर्थ काढू नये, असे राऊत म्हणाले.