मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्थांना महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असल्यास त्यांना राज्य सरकारची परवानगी घ्यायची गरज आहे का, या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी राज्य सरकारच्या अधिकारांचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
ईडी, सीबीआय या संस्था ज्या ठिकाणी विरोधकांचे किंवा विरोधी विचारांचे राज्य सरकार आहे, त्यांना बदनाम करत असल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्रीय तपास संस्थांमार्फत केंद्र सरकार निशाणा साधते. मात्र यापुढे राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. आता आमच्या संयमाचा बांध तुटला आहे. आता कडेलोट झाला आहे, असे राऊत म्हणाले.