मुंबई- नारायण राणे यांची भूमिका भाजपची असेल तर त्यांनी तसे घोषित करावे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ( Sanjay Raut Slammed Narayan Rane ) लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी उलथापालथ होत आहे.
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले, की रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्याबाबत ( Narayan Rane on Sharad Pawar ) अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही. शरद पवारांना धमकी देण्याइतका काही नेत्यांचा माज वाढला आहे. आमदारा मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. शरद पवारांना धमक्या देण्याइतका माज काही नेत्यांचा वाढला आहे. त्यांचा विचार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना करावा लागणार आहे. सत्ता आणि बहुमत चंचल असते, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हटले होते नारायण राणे यांनी?भाजपचे नेते नारायण राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही.