मुंबई -शनिवारी हायहोल्टेज ड्रामा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मतं कुठं गेली? घोडे बाजारात फुटलेले अपक्ष आमदार कोण आहेत? याचा तपास सध्या महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे आमदार देवेंद्र भुयार. त्यांच्यावर देखील या घोडेबाजारात फुटल्याचा आरोप झाला आणि भुयार नाराज झाले. यावर आता खुद्द संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ते लोक मूर्ख आहेत -यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "आम्ही आता अयोध्येला निघालो आहे. आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस देखील आहे. 15 तारखेला ते अयोध्येत पोहोचतील तिथून ते राम जन्म भूमीचं दर्शन घेतील, जिथं नवीन मंदिराची उभारणी सुरू आहे. तिथं भेट देतील, इस्कॉन मंदिराला भेट देतील आणि संध्याकाळची महाआरती देखील करतील. असा हा सुटसुटीत कार्यक्रम आहे. हा राजकीय इव्हेंट नाही किंवा शक्ती प्रदर्शन नाही. आमची जी काही श्रद्धा भावना आहे, त्या भूमिविषयी त्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे. जे लोक आमच्या दौऱ्यावर टीका करत आहेत, ते मुर्ख आहेत."
शक्ती प्रदर्शन नाही संताप -काँग्रेसकडून आज केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा विषयी बोलताना राऊत म्हणाले की, "काँग्रेसचं ते शक्ती प्रदर्शन नसून हा संताप आहे. तुम्ही याला शक्ती प्रदर्शन का म्हणता? या देशात भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत. त्यांना त्रास देण्याचा एक भाग म्हणून या तपास यंत्रणांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. नॅशनल हॅरोल्डचा इतिहास सर्वांनीच समजून घेतला पाहिजे. विशेषतः भाजपने. त्यामुळे मला वाटत ज्या प्रकारे हा छळ सुरू आहे तो लोकशाहीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला खड्ड्यात घालणारा आहे."
मुख्यमंत्र्यांना सांगणार -राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजारात आमदार देवेंद्र भुयार हे देखील फुटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपांमुळे भुयार नाराज झाले आणि त्यांनी शरद पवार, अजित पवार यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर त्यांनी आरोप करणाऱ्या संजय राऊत यांची देखील भेट घेतली. या भेटी संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, "देवेंद्र भुयार यांनी काल भेट घेतली. आमचं बोलणं झालं सविस्तर या विषयावर. हे बरोबर की त्यांच्या विषयी आम्ही सर्वांनीच जी काही वक्तव्य केली होती. पण, त्यांच्या बोलण्यात मला खरे पणा दिसला. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मी आज मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. कारण भुयार यांच्याशी बोलताना मला वाटलं की ते खरं बोलतायत."
हेही वाचा -Website Hacked: भारत विरोधी मोहीमेचा भाग, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक