मुंबई -शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले संजय राऊत यांची पुन्हा एका पीएमसी बँक प्रकरणात (PMC Bank Scam) चौकशी होण्याची शक्यता आहे. उद्या (4 ऑगस्ट) संजय राऊत यांची ईडी कोठडी संपणार असून, त्यांना सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे.
संजय राऊत ईडी कोठडीत - संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर ईडीकडून सत्र न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला होता की, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्याासाठी फ्रंटमॅन म्हणून काम करायचे. प्रवीण राऊत यांच्या विरोधात यापूर्वीच पीएमएलसी बँक प्रकरणात चौकशी सुरू असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने प्रवीण राऊत यांची बँक घोटाळा प्रकरणात चौकशी केलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये संजय राऊत यांची देखील पीएमएलसी बँक घोटाळ्याप्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पीएमसी बँक प्रकरण - सध्या ईडीच्या अटकेत असलेले प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे त्यांनी आपले कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळविले होते. यातील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही नावे वळविण्यात आल्याचे प्रवीण राऊत यांच्या चौकशीदरम्यान बोलले गेले. तसेच याच पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावे दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे 8 भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ईडीने राऊत यांच्यावर ठेवला. त्या अनुषंगाने ईडीने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती आणि वर्षा राऊत यांच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच किहीममधील 8 भूखंड अशी 11 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केलेली आहे. या प्रकरणी राऊत यांना पुन्हा जुलै महिन्यात दोन वेळा चौकशीसाठी ईडीने समन्स जारी केले होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आता रविवारी ईडीने ही छापेमारी करत संजय राऊत यांना अटक केले आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त -पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं होतं.