मुंबई- राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू ( draupadi murmu ) यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय खासदार यांनी मांडली. खासदारांची मत घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे. मातोश्री येथे खासदारांच्या बैठकीतून नाराजीने गेल्याची चर्चा चुकीचे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक-18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार करत आहेत. ठाकरेंवर खासदारांचाही दबाव वाढत आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी बंड केल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक झाली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीला किती खासदार:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी तब्बल 7 खासदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय बैठकीत होणार होता. आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यातच खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे खासदाराही खरेच बंड करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे खासदार उपस्थित : उपस्थित खासदारांमधे गजानन कीर्तिकर - उत्तर मुंबई, अरविंद सावंत - मुंबई दक्षिण, विनायक राउत - रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धैर्यशील माने - हातकणंगले, हेमंत गोडसे - नाशिक, राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई, श्रीरंग बारणे - पिंपरी चिंचवड, प्रताप जाधव - बुलढाणा, सदशिव लोखंडे - शिर्डी, ओमराजे निंबाळकर- उस्मानाबाद, राजेंद्र गावित- पालघर,राजन विचारे - ठाणे, ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांची बैठकीला हजेरी होती.
हे खासदार गैरहजर: गैरहजर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम - भावना गवळी, परभणी - संजय जाधव, कोल्हापूर - संजय मांडलिक, हिंगोली - हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे, रामटेक - कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर यांचा समावेश होता. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे. तुमाने यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला होता तसेच मी दिल्लीत नव्हतोच असे म्हणले होते.
भाजपा समर्थित आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारद्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आदी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा यांना मैदानात उतरविले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्यामुळे उद्धव ठाकरे हे आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार हे अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
काय आहे पत्रात ? :दिवंगत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तत्कालीन यूपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार तथा पहिल्या मराठी भाषिक प्रतिभा पाटील तसेच प्रणय मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता आणि दोघेही देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. या गोष्टीचे स्मरण करून आपण आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन आदिवासी समाजाचा सन्मान करावा, त्या देशाच्या आदिवासी समाजाच्या पहिल्या राष्ट्रपती असतील. शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास देशातील तमाम आदिवासी समाज आपला ऋणी राहील, अशा विनंतीचे पत्र खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.