मुंबई - राज्यसभा सभासद निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नाव निवडीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने दोन जागांवर दावा केला असून एका जागेसाठी संजय राऊत ( Sanjay Raut name for Rajya Sabha ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा नवा विक्रम राऊत ( Sanjay Raut news on Rajya Sabha ) यांच्या नावावर असेल.
हेही वाचा -4 वर्षीय मुलाचे अपहरण करणारा सुरक्षारक्षक गजाआड, 50 हजार रुपयांची मागितली होती खंडणी
राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होत असून या जागांवर दहा जूनला मतदान होणार आहे. विधानसभेच्या मताधिक्यानुसार भाजपच्या दोन जागा निवडून येतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहजरित्या विजयी होईल. मात्र, सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि अपक्ष उमेदवार संभाजीराजे इच्छुक आहेत. शिवसेना दोन जागा लढवणार असून पहिल्या जागेवर शिवसेना नेते संजय राऊत यांचे नाव निश्चित झाले आहे. सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा पराक्रम संजय राऊत करणार आहेत. यापूर्वी नजमा हेपतुल्ला महाराष्ट्रातून सलग चार वेळा राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. तर, काँग्रेसकडून सरोज खोपर्डे पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम येत्या चार जुलैला निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. शिवसेनेने दोन जागांवर दावा केल्याने आणि छत्रपती संभाजी राजे अपक्ष उमेदवार लढत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. मात्र, संभाजी राजे शिवसेनेकडून न लढल्यास दुसऱ्या जागेसाठी चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, रामदास कदम, उर्मिला मातोंडकर यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढावी, असे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीराजे इच्छुक असल्यास त्यांना संधी दिली जाणार आहे.
हेही वाचा -बलात्कारातून गर्भवती अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी उच्च न्यायालयात याचिका