मुंबई - कालची औरंगाबादच्या ( Aurangabad ) मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरची सभा ऐतिहासिक होती. जे टीका करत आहेत त्यांची बुबुळं काल बाहेर आली असतील, अशी अतिविराट सभा काल झाली. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्याला काही महत्व देण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सर्वच मुद्यांवर भाष्य केलं. विशेषकरून औरंगाबादचा जो पाणी प्रश्न आहे, कश्मिरी पंडितांचा मुद्दा असेल या सगळ्यांवर त्यांनी एक ठाम राजकीय भूमिका घेतलेली आहे. आता यावर टीका करण्यासारखं काय आहे ? सध्या विरोधकांनी विरोधासाठी विरोध हे काही धोरण अवलंबले आहे. त्यामुळे त्यांचाच सत्यानाश होणार आहे, असे संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले. ते मुंबईत ( Mumbai ) आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
पंकजा मुंडेंना डावलंणे व्यथित करणारं -पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या उमेदवारीवर बोलताना राऊत म्हणाले की, "कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. पण मागची पंचवीस वर्ष जी काही शिवसेना आणि भाजपची युती टिकली त्यात मुंडे आणि महाजन यांचा सर्वात मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज देखील या दोन कुटुंबांना महत्त्वाचे स्थान आहे. ही दोन्ही कुटुंब बहुजन समाजाची नेतृत्व करतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत आम्ही ज्या काही बातम्या वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या आहेत.