मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena Leader Sanjay Raut ) यांनी बेहिशेबी रक्कम त्यांचे नातेवाईकांच्या नावाने स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यात वळविल्याची माहिती राऊत यांची माजी सहकारी आणि पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर ( Swapna Patkar ) यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिलेल्या जबाबमध्ये म्हटले आहे. पत्राचाळ घोटाळ्यात ( Patra Chawl Scam Case ) आरोपी असलेले शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गेल्या आठवड्यात ईडीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रात ( ED filed supplementary charge sheet ) पाटकर यांचा जबाब जोडण्यात आला आहे.
बेहिशेबी पैसे बनावट कंपन्यांत गुंतवले : स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या जबाबमध्ये असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी राऊटर्स एन्टरटेन्मेंट एलएलपीची स्थापना केली. या कंपनीने ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली. या कंपनीत त्यांनी बेहिशेबी रक्कम वळविली होती. तसेच त्यांना मद्य कंपनीतही रस होता. त्यांनी 2021 मध्ये एक मद्य कंपनी घेतली. याव्यतिरिक्त राऊत यांनी बेहिशेबी पैसे त्यांचे कुटुंबीय आणी सहकाऱ्यांच्या नावे काढलेल्या बनावट कंपन्यांत गुंतवले, असे पाटकर यांनी ईडीला जबाबात सांगितले.
बाळकडू चित्रपट आणी 50 लाख :मी कोणत्याही कंपनीशी संलग्न नाही. माझी पत्नी आणि मुलगी एन्टरटेन्मेंट कंपनी चालवित असल्याचे राऊत यांनी ईडीला चौकशीत सांगितले आहे. जानेवारी 2015 मध्ये बाळकडू नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तरीही या चित्रपटाने 60 लाखांचा नफा कमावला. संजय राऊत यांनी चित्रपट निर्मितीत कोणतेही योगदान न देता माझ्याकडून त्यांच्या नावे 50 लाखांचा धनादेश घेतला अशी माहितीही पाटकर यांनी दिली.