मुंबई - कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे तीन पक्षाचे सरकार मागील वर्षी राज्यात सत्तारुढ झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
या मुलाखतीत मुख्यमंत्री जनतेला काय सूचना देतात, याची चर्चा आतापासून होत आहे. गेल्या वर्षभरात सरकारचे मोठे निर्णय, कोरोना काळातील प्रशासन आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेची रणनिती याच्यावर देखील मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. भाजपच्या सरकार पडण्याच्या दाव्याला उत्तर या मुलाखतीत असणार असल्याची शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे.
मुलाखतीबाबत सस्पेन्स -
राज्यावरील कोरोनाचं संकट, विरोधी पक्षातील नेत्यांच्या ईडी चौकश्या, मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून झालेलं राजकारण, सत्ता बदलाचे विरोधकांकडून होत असलेले दावे आणि बिहार विधानसभा निवडणूक निकाल या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत काय भाष्य केलं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, मुलाखतीचे मुद्दे अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याने या मुलाखतीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
संजय राऊत यांनी मुलाखतीचे फोटो केले शेअर -
शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुलाखत घेतानाचे तीन फोटो शेअर केले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत. लवकरच…’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षभरातील मुद्दे असणार चर्चेत -
उद्धव ठाकरे यांनी राज्याची सत्ता सांभाळल्यापासून या सरकारला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, त्यामुळे उद्योगधंदे बंद होऊन रुतलेलं आर्थिक चक्र, त्यानंतर आलेलं वादळ, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पूरस्थिती आदी नैसर्गिक संकटाना राज्याला सामोरे जावं लागलं. राज्य सरकार या संकटाचा सामना करत असतानाच विरोधकांकडून मंदिर उघडण्यासाठी आणि रेल्वे सुरू करण्यासाठी आंदोलनं करण्यात आली. पालघर साधू हत्याकांड, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण प्रकरण, कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक आदी गोष्टींचाही या सरकारला सामना करावा लागला. या सर्व प्रश्नांना उद्धव ठाकरेंचे काय उत्तर असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर आणि या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत करायच्या आघाडीवरही उद्धव ठाकरे भाष्य करणार असल्याचा अंदाज आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांची मुलाखत वादळी व राज्यात खळबळ माजवणारी असल्याचे सांगण्यात येत आहे.