मुंबई -विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad Election 2022 ) दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. भाजपाने पाच उमेदवार दिले असून, पाचवी जागा जिंकण्यासाठी वीस मतांची आवश्यकता आहे. ही मते कुठून आणणार, चोऱ्या माऱ्या, दबाव आणि दशहत टाकून मते मिळवणार ना. तसेच, लोकशाहीत खुलेआम दबाव आणि दशहत माजवली जात आहे. त्यामुळे स्वपक्षांच्या आमदारांना हॉटेल्समध्ये ट्रेनिंग द्यावी लागत असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केला ( Sanjay Raut Criticized Bjp ) आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात हॉटेल राजकारणाला जबाबदार कोण, मत प्रक्रिया समजून सांगण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. पूर्वी सर्वांना एकत्र आणले जात नव्हते, परंतु सध्या होत आहे. महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष आहे. ज्यांच्याकडे केवळ दोन संख्याबळ जास्त आहे. त्यांना पाचवी जागा जिंकण्यासाठी वीस मतांची आवश्यकता आहे. ही मते कुठून आणणार. चोऱ्या माऱ्या, दबाव आणि दशहत टाकून मते मिळवणार ना. लोकशाहीत हे प्रकार पूर्वी छुप्या पध्दतीने करत होते. आता थेट उघडपणे सुरु केले आहेत. भाजपाच्या अशा वृत्तीमुळे आमदारांना हॉटेल्समध्ये ट्रेनिंग दिली जाते. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाने मतभेदाच्या अफवा पसरवल्या आहेत. परंतु, तिन्ही पक्षात समन्वय आहे. त्यांनी कितीही अफवा परसवल्या तरी त्यांना फळ मिळणार नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.
'मतदानाचा अधिकार का नाकारला?' -देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकारा नाकारण्यात आला. त्यावर बोलताना राऊतांनी म्हटलं, खुन करणाऱ्या कैद्याला देखील मतदानाचा अधिकार आहे. मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना का मतदानाचा अधिकार नाही?. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. या दोन्ही सदस्यांना कोणत्या न्यायाने मतदानाचा अधिकार नाकारला याविषयी संभ्रम आहे. महाविकास आघाडीची दोन मते कमी करण्यासाठी पडद्यामागून खेळ सुरु असून, दबावाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला. तसेच, देशाचे स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था धोक्यात आल्याचे राऊत म्हणाले.