मुंबई - राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे उलट-सुलट चर्चांना यामुळे उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांना मी सतत भेटत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
भेट होतच असते -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील ३ दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. तसेच राऊत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही भेटले. या भेटीमुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा त्यांना रोजच भेटायचो. परंतु आता मुख्यमंत्री आहेत, कामाचा व्याप वाढला आहे. आमचे फोनवर संभाषण होत असते. आता शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा
राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहेत. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर उघडपणे मत मांडले. राजकीय गोटात यानंतर खळबळ उडाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरून भाजपला सूचक इशारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठीवर भर दिला. मागील दोन दिवसांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.