मुंबई - एका शिवसैनिकाने खा. संजय राऊतांना चिन्ह गेल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ठोस प्रतिक्रिया दिली आहे. चिन्ह गेल्याची ही काही पहिली वेळ नाही, काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी यादेखील अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचेही चिन्ह ३ वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे हे काही नवीन नाही. बहुदा हे नवे चिन्हचं शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे सर्वांना माहीत आहे खरी शिवसेना कुणाची हे सर्वांना माहीत आहे, असेही राऊत म्हणाले.
अंधेरी निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण व नाव हे शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रात सध्या संतापाचे वातावरण आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालय परिसरात भेटण्यासाठी खासदार विनायक राऊत आणि वरून सरदेसाई न्यायालयात उपस्थित आहेत. संजय राऊत गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवसेनेच्या या वर्षीच्या दसरा मेळाव्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने हजर राहू न शकल्याने आज शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालया परिसरात उपस्थित आहेत.
शिवसेनेच्या पुढील गणितावर देखील या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. एका शिवसैनिकाने राऊतांना चिन्ह गेल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिवसेनेने नवीन नाव आणि चिन्हासह निवडणुका लढण्याची मानसिकता तयार केल्याचे दिसते.
मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार असल्याने राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याकरता आलेल्या शिवसैनिकांच्याबरोबर राऊत यांनी संवाद साधला.