मुंबई : केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी आणि दहशतवादी म्हणणे हा देशातील प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान आहे. या शेतकऱ्यांना दहशतवादी न म्हणता, पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. कारण, हे शेतकरी आहेत, म्हणूनच देश आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत आज म्हणाले.
पटेलांचा पुतळाही आंदोलन पाहून अश्रू ढाळत असेल..
सरदार पटेलांना भाजप सर्वोच्च स्थानी मानत. पटेल हे एक शेतकरी नेते होते, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत आज जे होत आहे ते पाहून त्यांच्या मूर्तीमधूनही अश्रू येत असतील, असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे, तोच वापर चीन आणि लडाखसाठी करायचा होता, असा टोलाही राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
शेतकऱ्याला देशद्रोही म्हणणे दुर्दैवी..
ज्या शेतकऱ्यामुळे हा देश आहे, त्या शेतकऱ्यालाच दहशतवादी, खलिस्तानवादी म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे. हे शेतकरी पंजाबचे आहेत म्हणून ते खलिस्तानवादी ठरणार का? उलट याच शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करुन जगासमोर आदर्श उभारला आहे, असेही राऊत म्हणाले.