मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता मोठा खुलासा होत आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी पैशाची मागणी केली गेल्याची माहिती मिळत आहे. हा मोठा खुलासा केला आहे किरण गोसावी यांचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल हे या प्रकरणातील पंच असून आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थांमार्फत 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एनसीबीवर आणि त्यांच्या या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह यापूर्वीच उपस्थित झाले होते. ते आता या खुलाशानंतर अधिकच गडद झाले आहेत. या खुलाशानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
काय म्हटले संजय राऊत
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, एनसीबीकडून साक्षीदार असलेल्या व्यक्तीची एका कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा प्रकार धक्कादायक आहे. तसेच आर्यनला सोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याची देखील माहिती मिळत आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची स्वत:हून दखल घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना ट्विट टॅग केले आहे.