मुंबई -शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) काळात महाआयटीत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच राज्य सरकार पाडण्यासाठी मदत करा नाहीतर ईडीचा (ED) ससेमिरा तुमच्या मागे लावू, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद - सरकार पाडण्यासाठी भाजपने मदत मागितली होती -संजय राऊत
केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितले की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली, असेही राऊत यावेळी म्हणाले.
- आपल्या टेलरची ईडीकडून चौकशी - संजय राऊत
आपल्या मुलीच्या लग्नात मेहंदी आणि नेलपॉलिश करणाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच मी ज्या ठिकाणी कपडे शिवतो त्या टेलरचीही चौकशी ईडीने केली आहे. ईडीला काही कामं नाहीत का? तसेच किरीट सोमैयांविरोधान अनेक पुरावे मी ईडीकडे दिली होते. मात्र, त्यावर ईडीकडून कोणतीही चौकशी झाली नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
- ईडीच्या अधिकाऱ्यांना घाम फुटेल - राऊत
जितेंद्र चंद्रालाल नवलानी कोण आहेत, हे ईडीने सांगावे. नवलानीचे नाव ऐकूण दिल्ली ते मुंबईच्या ईडी अधिकाऱ्यांना घाम फुटेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच मुंबईच्या 70 बिल्डरांकडून ईडी आणि दलालाकडून वसूली केली जात आहे. 70 बिल्डरांकडून किमान 300 कोटी वसूल केले. यात ईडीचे काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.
- मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार
मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा असून पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवानकडून केबीजी ग्रुपने 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपकडे आहेत. त्यासाठीचा पैसे कुठून आला याची माहिती फडणवीसांना माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले.
- त्या लग्नसोहळ्यावर राऊत यांचं विधान -
दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळच्या वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला. त्या लग्नात कार्पेट हे साडे नऊ कोटी रुपयांचे होते. हे ईडीला दिसलं नाही, पण मी कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास केला. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सरकारातील वनमंत्र्यांच्या घरी लग्न होते. ते वनमंत्री होते म्हणून लग्नाची थीम ही जंगलाची होती. त्यावेळी तिथले कार्पेट हे साडे नऊ कोटींचे होते. या लग्नात अवाढव्य खर्च केला होता. हे ईडीला कधी दिसले नाही? असा सवालही राऊत यांनी केला आहे.
- साडेतीन लोकांची नावे गुलदस्त्यात
झुकेंगे नही, सांगत भाजपची साडेतीन लोकं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचया ठिकाणी असतील, अन् देशमुख बाहेर येतील, असे विधान राऊत यांनी सोमवारी केले होते. संपूर्ण राज्याचे आजच्या पत्रकार परिषदकडे लक्ष होते. मात्र, राऊत यांनी किरीट सोमैया आणि त्यांचा मुलगा निल सोमैया याच्या नावाव्यतिरिक्त इतर नावे घेण्याचे टाळले. यावेळी पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आणली. मात्र ती साडेतीन लोक कोण, हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवत, ही सुरुवात असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.