मुंबई- काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकुट मी नवीन प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना देऊन जात आहे. त्यांना यातील बरेच काटे टोचतील, त्याच्या वेदनाही होतील. मात्र, त्यांना त्या काट्याऐवजी कायम फुले मिळावे, अशा शुभेच्छा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांच्यावर सोपवताना संजय निरुपम यांनी दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मनातली खदखद समारोपाच्या भाषणातून व्यक्त केली. आज काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांनी मोठ्या गाजावाजात स्वीकारला.
प्रदेशाध्यक्षपदाच्या काटेरी मुकुटातील काटे मिलिंद देवरांना टोचतील - संजय निरुपम - CONGRESS
आज काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांनी मोठ्या गाजावाजात स्वीकारला.
यावेळी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, प्रा.जनार्धन चांदूरकर, उर्मिला मातोंडकर, आदी दिगग्ज नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या काळातच निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केल्याने त्यांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. आपल्यावर मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर देशात आणि राज्यात आपले सरकार नव्हते, अत्यंत कठीण काळात मी जबाबदारी घेतली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे त्या काळात जे माझ्यासोबत होते, त्यांचे आणि माझ्यासोबत न येता विरोधात राहिले त्यांचेही मी स्वागत करतो, असेही निरुपम म्हणाले.
एकनाथ गायकवाड यांचे नाव घेतलेच नाही -
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडत असताना मंचावर निरूपम यांच्या विरोधातील अनेक नेते मंचावर होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सर्व नेत्यांची नावे आदराने घेतली. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी आपल्या भाषणात निरुपम यांच्या नावाचा साधा उल्लेख केला नाही. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी मात्र पदभार स्वीकारताना निरुपम यांच्या योगदानाचे कौतुक करत ते कायम माझ्या सोबत असतील असा विश्वास व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईत आता तरुण नेतृत्व मिळाले असल्याने २००९ प्रमाणे सर्व लोकसभेच्या जागा जिंकुन आणण्याचे आवाहन केले.