मुंबई - भाजपाला सत्तेतून खाली खेचत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन केले. गेल्या दीड वर्षात सरकारने अनेक संकटाचा सामना केला आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आशा परिस्थितीतही उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख 13 राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”, असे ते म्हणाले.
'आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो अभ्यास करायचा नाही. पण तो वर्गात नंबर वन यायचा. एकतर तो खूप हुशार असेल किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला असेल, असेच मुंख्यमंत्र्यांचे आहे', अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात काय केलं?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.