मुंबई -उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा दूरूपयोग सध्या भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु, भाजपने कितीही त्रास दिला तरी संजय राऊत हे शिवसेनेला सोडणार नाहीत. ( Patra Chawl Case ) आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे संजय राऊत लवकरच बाहेर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उद्या गुरुवार (दि. 3 ऑगस्ट)रोजी राऊत यांची कोठडी संपणार आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
संजय राऊत यांना ईडीने रविवारी मध्यरात्री अटक - संजय राऊत यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेगुलर वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. संजय राऊत यांना ईडीने रविवारी मध्यरात्री अटक केल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सोमवारी हजर करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडीत रवानगी करण्यात आले होते. सध्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
काय आहे पत्राचाळ घोटाळा? -मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.