महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Day 2022 : महाराष्ट्राच्या निर्मितीत 'संयुक्त महाराष्ट्र समिती' मैलाचा दगड - Maharashtra Day 2022

बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली. यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच १ मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

संयुक्त महाराष्ट्र समिती
संयुक्त महाराष्ट्र समिती

By

Published : May 1, 2022, 1:02 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये २५ एप्रिल १९६० रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम १९६० नुसार अस्तित्वात आली. त्यानंतर १ मे १९६० रोजी हा कायदा अंमलात आणला गेला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली. यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच १ मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

चळवळीतील आंदोलन

संयुक्त महाराष्ट्र : ऐतिहासिक पार्श्वभूमी -१९०८ च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैध यांनी या एकीकरणाचा उल्लेख केला होता. ‘मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी’ असे मत व्यक्त करण्यात आले होते. लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती. आपल्या दै. केसरीतून त्याचे महत्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितली. रामराव देशमुख हे मध्य प्रांत व वऱ्हाड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. त्यांनी १ ऑक्टोबर १९३८ साली ठराव मांडला त्यात वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा असे सांगितले. १९४१ साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ‘ संयुक्त महाराष्ट्र सभा’ ही संघटना स्थापन झाली. पुढील वर्षी डॉ.टी.जे. केदार यांच्या नेतुत्वाखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरवण्यात आली. तत्पूर्वी १९४० च्या प्रारंभी वाकरणकर यांनी धनंजयराव गाडगीळ व न. वि. पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला होता. तर महाविदर्भ व्हावा असे लोकनायक बापूजी अणे यांना वाटत होते.

संयुक्त महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना - ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा घेतली. सर्वांनी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, असा अर्थ काढून शंकरराव देव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. तेव्हा शंकरराव देव यांनी १० फेब्रुवारी रोजी अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र एकीकरण परिषद बरखास्त केली. शंकराव देव समितीत सामील झाले नाहीत आणि आंदोलनापासूनही दुरावले. त्यांचे प्रयत्न, हालचाली काँग्रेसच्या धोरणाशी निगडित राहिल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने संयुक्त महाराष्ट्र परिदेचे उद्देश स्वीकारले. समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉ. तरयं. रा. नरवणे, जनरल सेक्रेटरी एस. एम. जोशी यांची निवड झाली. आंदोलनासाठी वृत्तपत्रांची आवश्यकता ओळखून आचार्य अत्रे यांनी ‘दे. मराठा’ पत्र सुरू केले. ‘प्रबोधन’, ‘नवाकाळ’, ‘सकाळ’, ‘नवयुग’, ‘प्रभात’ अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी (त्याला छक्कड म्हणतात) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत ठरले. ती छक्कड म्हणजे ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ अशी होती. या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. ही लावणी मुंबईच्या लालबावटा कलापथकातील शाहीर अमर शेख यांनी गायली होती.

हेही वाचा -1 May Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्ताने जाणून घेऊया मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची यशोगाथा

अखेर दिल्लीने गुडघे टेकले! - या विषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी सांगतात की, १ मे १९६० या दिवशी १०५ बहाद्दरांनी आपल्या प्राणांची 'आहुति' देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे आंदोलन उभे केले ते श्रीधर महादेव तथा एस एम जोशी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, भाई श्रीपाद अमृत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमरशेख आदी लढवय्या नेत्यांच्या आंदोलनानंतर केंद्रातले नेहरु सरकार नरमले आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला. त्यापूर्वी म्हणजे १९३७ साली बॉम्बे प्रोविन्सो अर्थात मुंबई इलाखा अस्तित्वात होता. सर धनजीशा बोमनजी कूपर हे १९३७ साली मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना पंतप्रधान म्हणून संबोधण्यात येत होते. १९ जुलै १९३७ रोजी बाळ गंगाधर खेर हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री झाले. १९ जुलै १९३७ ते ४ नोव्हेंबर १९३९ आणि ३ एप्रिल १९४६ ते १६ एप्रिल १९५२ या कालावधीत बाळ गंगाधर खेर यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द केली. १७ एप्रिल १९५२ ते ३१ ऑक्टोबर १९५६ या कालावधीत कर्मठ प्रशासक असलेल्या मोरारजी रणछोडजी देसाई यांनी बॉम्बे प्रोविन्सचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन पेटले असतांना केंद्राने आणखीन डिवचण्यासाठी मुंबई द्विभाषिक राज्याचा घाट घातला आणि त्याचे १ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. पण संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सेनानी काही केल्या हटत नाहीत पाहिल्यावर दिल्लीने गुडघे टेकले आणि १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details