मुंबई-अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या ड्रग कनेक्शन संबंधी सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांची एनसीबीने आज चौकशी केली. दिवसभर तब्बल अकरा तासाच्या चौकशीनंतर दोघांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) चे उपमहासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दिली. या दोघांनाही उद्या (शनिवारी) न्यायालयापुढे हजर केले जाणार असून एनसीबी कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रियाच्या अटकेसंदर्भात निर्णय न झाल्याची माहिती शोविक आणि सॅम्युअल मिरांडा याने चौकशीमध्ये सहकार्य केले आहे. याप्रकरणी अधिक खोलवर माहिती घेऊन ड्रग रॅकेट उघड करण्यासाठी या दोघांचीही आणखी चौकशी केली जाणार असून त्यासाठीच अटक केले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करून एनसीबी कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती उपमहासंचालक केपीएस मल्होत्रा यांनी पत्रकारांना दिली. रिया चक्रवर्ती ला अटक करण्याचा कोणताही निर्णय आतापर्यंत झाला नसून उगाच अफवा उठवू नका, असे आवाहन मल्होत्रा यांनी या वेळेस पत्रकारांना केले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आतापर्यंत पाच अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला होता. एनसीबीचे विशेष पथक तपासासाठी मुंबईत आले आहे. बॉलीवूड किंवा मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा (बड/गांजाचे प्रतिनाम) विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार आणि इब्राहिम
या पाच तरुणांना अटक करण्यात आली. शोविक अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या संपर्कात होता, हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाल्याची माहिती आहे.
विशेष तपास पथकाकडून सुशांतच्या मृत्यूत अमली पदार्थाच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीतून हाती लागलेल्या माहितीची शहानिशा आणि सखोल तपास आवश्यक आहे. त्याआधारेच सुशांतच्या मृत्यूसोबत बॉलीवूडला अमली पदार्थ पुरवणारी विक्रेत्यांची टोळी शोधून काढणे शक्य होईल, असे सांगत एनसीबीने आरोपी झैद आणि अब्दुल बासित परिहार याला पोलीस कोठडीत पाठवावे, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने झैदला ९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती या दोघांच्या घरी एनसीबीने सकाळी छापे मारल्यानंतर दोघांचीही सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एनसीबी च्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. दोघांनी चौकशीमध्ये सहकार्य केले असून ड्रग विक्रेत्यांची मोठी लिंक उघड करण्यासाठी अधिक चौकशी करावी लागणार असल्याने एनसीबी कोठडीची गरज आहे. त्यासाठी त्यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. रिया चक्रवर्तीला अटक करण्यासंदर्भात कोणताही निर्णय न झाल्याची माहिती त्यांनी दिली.