महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Malik Vs Wankhede : नबाब मलिकांच्या आरोपाला समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर.. अनेक आरोपांचे खंडन

गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील आणि विशेषत: मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. समीर वानखेडेंनी कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह ८ आरोपींना अटक केली. पण तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे आणि एनसीबीवर टीका केली आहे. यावरून नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

Sameer Wankhede
Sameer Wankhede

By

Published : Nov 6, 2021, 7:56 PM IST

मुंबई - गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील आणि विशेषत: मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. समीर वानखेडेंनी कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह ८ आरोपींना अटक केली. पण तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे आणि एनसीबीवर टीका केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, आपल्याला या तपासातून हटवलं नसल्याचा दावा समीर वानखेडेंकडून करण्यात आल्यानंतर त्यावर आता नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून हटविण्यात आले आहे.


वानखेडे दिशाभूल करत आहेत -

समीर वानखेडे यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करत आहेत. त्यांनी कोर्टात रीट याचिका दाखल करुन जबरदस्तीने वसुली आणि भष्ट्राचाराबाबत जे आरोप लावण्यात आले आहेत त्याची चौकशी सीबीआय किंवा एनआयएकडून करण्यात यावी, मुंबई पोलिसांकडून नाही, अशी मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. देशाला सत्य समजलं पाहिजे' असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे.


समीर वानखेडेंचा दावा -

मात्र, या सगळ्या गोंधळानंतर समीर वानखेडेंनी एएनआयला प्रतिक्रिया देताना आपल्याला या प्रकरणाच्या तपासातून काढलेले नसल्याचा दावा केला. "मला तपासातून काढण्यात आलेलं नाही. मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती की, या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान प्रकरण दिल्ली एनसीबीच्या एसआयटीमार्फत हाताळले जात आहे. दिल्ली आणि मुंबई एनसीबीमधले हे परस्पर सहकार्य आहे", असं समीर वानखेडे म्हणाले.


आरोप-
समीर वानखेडे दुबईला गेले होते -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवला गेले असल्याचे मान्य केले, मात्र ते दुबईला कधी गेले नाहीत, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. मात्र, समीर वानखेडे हे दुबईलाही गेले होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत एक फोटोही शेअर केला आहे.

उत्तर-
मी दुबईला कधी गेलो? वेळ तर सांगा -वानखेडे

मी मंत्री महोदयांचे बोलणं ऐकलं आहे. त्यांनी कुठले पुरावे सादर केले आहेत? मी त्याचे बोलणं ऐकलंय. ते मला दुबईत गेल्याचं म्हणाले. त्यांनी पुरावा म्हणून माझा कुठलातरी दुबईतला फोटो पत्रकार परिषदेत सादर केलाय. मी मंत्री साहेबांना विनंती करतो की, मी कधी आणि कोणत्या वर्षी दुबईला गेलो? ते सांगा”, असं आवाहन वानखेडे यांनी केलं. ते मालदीव जाण्याचं बोलत आहेत. मालदीवला जाणं हे क्राईम आहे का? मी सरकारची अनुमती घेऊन गेलो आहे. माझ्या मुलांबरोबर मी गेलो होतो. याचा अर्थ माझ्याकडून क्राईम झाला का? मी माझ्या कुटुंबासोबत मालदीवला गेलो म्हणून मला तुरुंगात टाकणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

आरोप -

मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात इशारा दिलाय. मावळमध्ये गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असे खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केला. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय ? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.

उत्तर -
माझ्यावर आरोप करतात ते ठीक पण माझ्या बहिणीवर, माझ्या मृत आईवर आरोप चुकीचे आहेत. मी खूप सर्वसामान्य लहान शासकीय कर्मचारी आहे. मी माझी जबाबदारी करतोय. ते माझ्यावर आरोप करतात ते ठीक आहे. पण माझ्या बहिणीवर, माझ्या मृत आईवर आणि वडिलांवर ते आरोप करत आहेत. मी त्यांचा आदर करतो. पण मी त्यांच्या आरोपांचे खंडन करतो. मी माझं काम करतोय. सत्यासाठी लढतोय. पण त्यावरुन माझ्या आई-वडिलांवर आरोप केले जात आहेत असं समीर वानखेडे म्हणाले.

समीर वानखेडे यांचे कोर्टात प्रतिज्ञापत्र -

त्यातच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत NCB च्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उभे केले आहे. त्यात आता समीर वानखेडे यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. साक्षीदाराने केलेल्या आरोपावर समीर वानखेडे सेशन कोर्टात गेलेत. त्याठिकाणी वानखेडे यांनी प्रभाकर साईलने कोर्टात तक्रार का केली नाही? असं म्हटलं आहे. प्रभाकर साईलनं २२ दिवसांनी हा आरोप का केला? असा सवाल समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत विचारला आहे.

आरोप -
वानखेडेंची जातप्रमाणपत्रावर चौकशी करा -

समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र मुंबई शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयातून काढण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर जातप्रमाणपत्र काढण्यात आलं आहे. मुंबई पोलीस ठाण्यात काही वकिलांनी तक्रारी दाखल केले आहे. प्रमाणपत्र वैध आहे की अवैध आहे हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जात पडताळणी समिती विभागावर तयार केली आहे. जीएडीने एक सर्क्युलर काढले होते की, २०२१ पुर्वी ज्या लोकांनी शासकीय नोकरी घेतली आहे. ज्यांनी जातपडताळणी केली नाही त्यांना बंधनकारक आहे की जातपडताळणी करुन घ्यावी. केंद्र सरकारला तो नियम लागू नसताना तक्रार झाली की, जात प्रमाणपत्राची पडताळणी करणं ही त्यांची जबाबदारी आहे. सामाजिक न्याय विभागाकडे लोकं तक्रार करणार आहेत. जात पडताळणी समिती आहे. कोकण विभागाची तिकडे पडताळणी होणार आहे. बोगस प्रमाणपत्र आहे हे सिद्ध होणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

उत्तर -

मी पहिल्यापासूनच अनुसूचित जातीचा आहे. माझी आई मुस्लिम होती आणि माझे वडील जाती व अनुसूचित होते मी मुळात राहणारा वाशिम जिल्ह्यातील आहे. नवाब मलिक यांनी माझ्यावर लावलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत. तसेच या संदर्भात मी माझ्याकडील सर्व कागदपत्रे अनुसूचित जाती आयोगापुढे ठेवले आहे असे समीर वानखडे यांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details