मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले सुरू आहेत. नवाब मलिक यांनी टि्वटरवर एक जन्म दाखला शेअर करुन समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा दावा केला होता. त्यावर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण केले आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेदेव वानखेडे म्हणाले, की माझे नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे. जन्मापासून ज्ञानदेव वानखेडे असे नाव आहे. माझे नाव दाऊद कधीही नव्हते. जन्मापासून माझे नाव ज्ञानदेव कचरुची वानखेडे आहे. शाळा, कॉलेज, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून निवृत्त होईपर्यंत माझे ज्ञानदेव वानखेडे नाव आहे. कोणी तरी हा खोडकरपणा केला आहे, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.
हेही वाचा-आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता
समीर वानखेडे मुस्लीम आहेत का? हा वाद नेमका काय आहे?
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट करत “पैचान कौन?” इतकंच लिहित वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील एकट्याचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे हे दलीत असून त्यांना लक्ष्य केले जात असल्याची टीका मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. त्यानंतर समीर हे दलीत नसून मुस्लीम असल्याचा खळबळजनक खुलासा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यासाठी त्यांनी समीर यांच्या जन्माचे प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यानंतर समीर यांनी हे गोष्ट फेटाळली होती.