मुंबई -मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Paitl ) यांनी आंदोलन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजे यांनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार व आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
बोलताना संभाजीराजे छत्रपती मराठा समाजाच्या मागण्या पंधरा दिवसांत मान्य करण्यात येतील, असे आश्वासन यापूर्वी झालेल्या आंदोलनावेळी करण्यात आले होते. पंधरा दिवसांऐवजी दोन महिने घ्या, पण मागण्या मान्य करा, अशी विनंती आम्ही सर्वांनी केली होती. मात्र, याबाबत पुढे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे आता सरकारकडून लेखी निर्णय देण्यात येत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही ( Chhatrapati Sambhajiraje Agitation ), अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपोषण थांबवण्याची विनंती केली. त्याचबरोबर मागण्यांविषयी चर्चा केली असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संबंधित मंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढणार, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
माझे उपोषण हे समाजासाठी -संभाजीराजे छत्रपती मागील दोन दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. त्यामुळे त्यांना आज अशक्तपणा जाणवत होता. यामुळे मराठा समन्वयक मसितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाही तर उद्यापासून (दि. 28 फेब्रुवारी) राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. मात्र, संभाजीराजे यांनी त्यांना संयमाने राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, माझे उपोषण हे समाजासाठी सुरू आहे. त्यामुळे याला गालबोट लागेल, असे काहीही करून नका.
हेही वाचा -Chhatrapati Sambhaji Raje Agitation : संभाजी राजेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार - दिलीप वळसे-पाटील