मुंबई - राष्ट्रपती नियुक्त खासदार पदाची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांपैकी एका जागेवर लढण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, आज ( 27 मे ) शिवसेनेच्या बदलत्या भुमिकेमुळे संभाजीराजेंना माघार घ्यावी ( Sambhajiraje Chhatrpati Wont Contest Rajyasabha Election ) लागली. त्यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाची समिती हातून गेल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी ( Sambhajiraje Chhatrapati React Archaeological Department Committee Post ) दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर मराठा समाजाच्या काही संघटनांच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तेव्हा संभाजीराजेंनी मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर सन २०१६ मध्ये संभाजीराजेंना राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत सदस्यत्व मिळाले. तसेच, केंद्रीय पुरातत्व खात्याच्या समितीत संभाजीराजेंना स्थान मिळाले. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांनी कामाचा धडाका लावला. किल्ले रायगड संवर्धन कामालाही चालना सुरुवात केली. संभाजीराजेंची नुकतीच राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे संभाजीराजेंनी विधानसभेतून राज्यसभेवर जाण्यासाठी जोर लावला. सहापैकी एका जागेसाठी सर्वपक्षीयांकडून मदतीची अपेक्षा केली. शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजेंनी उमेदवारी घ्यावी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे मांडण्यात आली. मात्र, शिवसेनेने भूमिका बदलल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक मुद्यांवर यावेळी भाष्य केले.
काय म्हणाले संभाजीराजें? - राज्यसभेवर खासदार असल्यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाची जबाबदारी होती. आता कोणतेही पद राहणार नाही. त्यामुळे रायगडच्या प्राधिकरणावर काम करता येणार नाही. बैठकीला ही उपस्थित राहता येणार नाही. खासदार असल्याने थेट रायगडावर ही प्रवेश मिळत होता. आता निर्बंध येतील. शिवसेनेसोबत तडजोड करायची यामुळे भूमिका घेतली. पण, तीही फिस्कटल्याने समिती हातून गेली आहे, अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.