मुंबई -संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा खासदारकीसाठी आपली इच्छा व्यक्त करीत अपक्ष उभे राहणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपल्याला मदत करावी. विशेषता मराठा आमदारांनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र राजकारणामध्ये कोणीही तुम्हाला सदिच्छा म्हणून मदत करत नाही. तर प्रत्येक पक्षाची राजकीय गरज असते आणि प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्या दृष्टीने राजकीय पक्ष आपापली मोर्चे बांधणी करीत असतात. म्हणूनच संभाजीराजे यांच्या या आवाहनाला राजकीय पक्षांनी अद्याप उघडपणे पाठिंबा दिलेला नाही. शरद पवार यांनी पाठिंबा देऊन केला असला तरी शिवसेनेच्या मदतीविना हे शक्य नाही आणि शिवसेनेला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी बांधील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुळात छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या घराण्याला राजकारण की समाजकारण हा पूर्वा पार पडलेला प्रश्न आहे. काही विशिष्ट गोष्टींसाठी त्यांना राजकारणात यायचे आहे मात्र त्यात सोबत राजा म्हणून समाजकारणातही राहायचे आहे या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारी तयारी मात्र त्यांच्याकडे नाही हेच आतापर्यंतच्या राजकारणावरून सिद्ध झाले आहे. याशिवाय राजघराण्याकडे परंपरागत असलेल्या शेकडो एकर जमिनीची मालकी आहे. या जमिनींसाठी राजांना राजकारणात सक्रिय राहायचे आहे का? अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
काय आहे संभाजीराजे यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास? -संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आणि विद्यमान शाहू महाराज यांनी 1990 च्या सुमारास राजकारणाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात आरएस पाटील यांच्या प्रचार सभांना हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी 1995 नंतर युती सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेशही केला. मात्र मितभाषी आणि मवाळ स्वभावाचा असलेल्या शाहू महाराज यांना राजकारणाची गती पकडता आली नाही आणि त्यांनी केव्हा राजकारणातून निवृत्ती घेतली, हेही लक्षात आले नाही.
मालोजी राजे आमदार झाले -शाहू राजे यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे यांनी मात्र समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रियपणे भाग घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली होती. मात्र 2004 च्या निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. राजकारणातला नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही त्यांच्याकडे पाठ फिरवत राजेश क्षीरसागर या शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली.
संभाजीराजे राष्ट्रवादीचे उमेदवार -2009 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र राजकारणात कसलेल्या आणि मुरलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यापुढे संभाजीराजे यांचा निभाव लागला नाही आणि ते पराभूत झाले. राजकारणातील पराभवामुळे खचून न जाता राजकारणात टिकले पाहिजे हे ठाऊक नसलेल्या संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणाकडे दुर्लक्ष केले.