मुंबई : आर्यन खान केस प्रकरणी सॅम डिसूझांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी हायकोर्टाकडे केली आहे. या प्रकरणी प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांत सॅम डिसूझांचे नाव आले आहे.
गोसावीने 50 लाख घेतले
या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावी याने आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले होते आणि एनसीबीने अटक केल्यानंतर ही रक्कम परत केल्याचा दावा डिसूझाने याचिकेतून केला आहे. या प्रकरणी 23 वर्षीय आर्यन खानच्या ताब्यात कोणतेही ड्रग सापडले नाही आणि तो निर्दोष असल्याची माहिती गोसावी यांनी दिली होती, असा दावाही त्यांनी केला. डिसूझाने आपल्या अर्जात म्हटले आहे की, त्याला या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. या प्रकरमात गोसावी आणि नंतरचे अंगरक्षक प्रभाकर सैल, जे या प्रकरणातील साक्षीदार होते, ते "मुख्य कटकारस्थान आणि फसवणूक करणारे" असल्याचे डिसूझाचे म्हणणे आहे.
डिसूझाच्या अर्जातील दावे
डिसोझा यांनी त्यांच्या अर्जात असाही दावा केला आहे की, 2 ऑक्टोबर रोजी त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीने एनसीबीने एका प्रभावशाली व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती दिली होती, त्यानंतर ते क्रूझ टर्मिनलच्या गेटवर गेले होते जेथे त्यांनी किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांची भेट घेतली होती. एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतल्याची माहिती गोसावी यांनी दिली. आर्यनला वडिलांची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी बोलायचे होते. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग नसून तो निर्दोष असल्याचा खुलासा किरण गोसावी यांनी केला होता. किरण गोसावी यांनी मला खात्री दिली की तो आर्यन खानला सोडविण्यात मदत करू शकतो आणि मला पूजा ददलानीशी संपर्क साधण्यास सांगितले, असे डिसूझाने अर्जात म्हटले आहे. त्यानंतर डिसूझांनी ददलानींशी संपर्क करत गोसावीसह लोअर परळ येथे तिची भेट घेतली. गोसावीने दादलानींना एक यादी दाखवली ज्यात आर्यन खानचे नाव नव्हते आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो त्याला मदत करू शकतो असे गोसावीने म्हटल्याचा दावा डिसूझाने अर्जात केला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी आर्यन खानला अटक झाल्याची माहिती समजली तेव्हा त्यांना धक्का बसल्याचे डिसूझाने म्हटले आहे. गोसावीने त्याचा अंगरक्षक प्रभाकर साईल याच्यामार्फत पूजा ददलानीकडून ५० लाख रुपये घेतल्याची माहिती त्याच्या ओळखीच्या सुनील पाटील यांनी दिल्याचे डिसूझाने म्हटले आहे. गोसावी आणि साईल हे फसवणूक करणारे आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. ही बाब समोर आल्यानंतर पैसे वसूल करून स्वत:ची प्रतिमा वाचविणे हाच अर्जदाराचा हेतू होता. त्यानंतर त्यांनी पैसे वसूल केले आणि ते तिच्या पतीमार्फत पूजा ददलानी यांना परत केले, असे डिसूझाने अर्जात म्हटले आहे.