मुंबई - राज्यातील केशकर्तनालये रविवारपासून सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील काही भाग अद्यापही प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी 28 जूनपासून म्हणजे उद्यापासून (रविवार) केशकर्तनालये सुरू होणार आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून बंद असणारी सलूनची दुकाने सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काही सलून चालकांनी त्यांची दुकाने सॅनिटाईज केली आहेत.
मुंबईतील सलून चालकांची दुकाने सुरू करण्याअगोदरची तयारी... केशकर्तनालय संघटना आणि सामान्य नागरिकांची मागणी लक्षात घेता, योग्य दक्षात घेत सलून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. केशकर्तनालयांचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य ती सुरक्षितता पुरवावी, असे आदेश सरकारने दिलेले आहेत. त्यानुसार उद्यापासून दुकाने सुरू होणार आहेत. म्हणून आजच मुंबईतील अनेक भागातील सलून चालकांनी दुकानांचे निर्जंतुकीकरण केले आहेत. याबाबत काही सलून चालकांसोबत ईटीव्ही भारतने बातचीत केली असता त्यांनी आपण कशाप्रकारे लोकांची काळजी घेणार आहोत याबाबत सांगितले.
हेही वाचा...'भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 5 लाखांचा टप्पा.. तरीही मोदींचे मौनच'
सलूनमध्ये हेअर कटला परवानगी देण्यात आली आहे. त्वचे संबंधित सेवा यात दाढी, मसाज या कामांना तूर्तास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे ज्या सेवा मिळणार नाहीत, त्याची माहिती दर्शवणारा फलक दुकानचालकांनी दर्शनी भागावर ठळकपणे लावले आहेत.
सरकारने दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी काम करणाऱ्या चालक/कर्मचाऱ्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हॅन्ड ग्लोव्हज, मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे. सरकारच्या सर्व सुचनांचे आम्ही पालन करणार आहोत. तसेच कामाच्या ठिकाणी खुर्च्या प्रत्येक वेळी सेवा दिल्यानंतर निर्जंतुक करणार आहोत. दुकानातील वापरातील भाग, जमिनीचा पृष्ठभाग दर दोन तासांनी निर्जंतुक करणार आहोत. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन यांचा वापर देखील वाढवणार असून नॉन डिस्पोजेबल साधनांना प्रत्येकवेळी वापरल्यानंतर सॅनिटाईज केले जाईल. तसेच प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर ग्राहकांसाठीच्या सूचना ठळकपणे लावून आम्ही दुकान सुरू करणार असल्याचे सलूनचालकांनी सांगितले.
हेही वाचा...देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
सरकारने संपूर्ण सोयीसुविधा सुरू कराव्यात. याचे कारण फक्त केस कापून आमचे दुकानाचे भाडे देखील निघणार नाही. कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा, अशा अनेक समस्या आम्हाला आहेत. त्यामुळे संपूर्ण सेवा देता याव्यात. हळूहळू तशी सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी दादर येथील सलून मालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.