मुंबई- लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वजण मध खातात. कुणी आवडीने तर कुणी औषध म्हणून खातात. सध्या तरुणांमध्ये फिटनेसचं, बारीक होण्याचं वेड असल्याने ते मधाचा वापर अधिक करतात. एकूण काय तर सद्या मधाची मागणी प्रचंड वाढली आहे. पण ग्राहकांनो हे मध खरेदी करताना जरा विशेष काळजी घ्या नाही तर हे गोड मध तुमच्यासाठी कडू ठरू शकते. कारण बाजारात भेसळयुक्त, बनावट मध विक्रीसाठी आणले जात असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. मंगळवारी एफडीएने भायखळा येथे छापा टाकत 34 लाख 59 हजार 126 रूपयांचा मधाचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे.
भेसळयुक्त मधाची बाजारात विक्री 2988 किलो मध जप्त
एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाच्या अन्न विभागाला मिळालेल्या माहितीनुसार 16 डिसेंबर, मंगळवारी अधिकाऱ्यांनी भायखळा येथे छापा टाकला. भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रा. लि. प्रीमायसेस येथील मेसर्स अंडर द मँगो ट्री नॅचरल अँड ऑरगॅनिक प्रा. लि. कंपनीवर छापा टाकला. यावेळी ड्रममध्ये पॅक करून मधाचा मोठा साठा ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानुसार कारवाई करत 2988 किलोचा कमी दर्जाचा मधाचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती शशिकांत केकरे सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी दिली आहे. तर जप्त करण्यात आलेल्या मधाची किंमत 34 लाख 59 हजार 126 रुपये अशी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भेसळयुक्त मधाची बाजारात विक्री 12 नमुने तपासणीसाठी पाठवले
या कंपनीमध्ये मोठ्या ड्रममध्ये मध साठवून ठेवले होते. तर रीपॅक करूनही मध ठेवले होते. हे मध कमी दर्जाचे असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तर काही पॅकिंगवर लेबल नव्हते. काहींवर होते पण त्यात माहिती नव्हती. एकूणच या ठिकाणी अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने हा साठा जप्त करण्यात आला आहे. तर मधाचे 12 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती ही केकरे यांनी दिली आहे. दरम्यान ग्राहकांनी मध खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. नोंदणीकृत दुकानातुनच मध खरेदी करावे आणि काहीही संशयास्पद वाटल्यास एफडीएशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.