मुंबई - महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणी मोठी ( Sakinaka Rape Case ) बातमी समोर आली आहे. बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणात आरोपी मोहन कतवारू चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणातदिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
पोलिसांनी केले होते दोषारोप पत्र दाखल - साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करत तिची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले होते. या प्रकरणात आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल ही राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतल्यानंतर हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांनीही या प्रकरणात तातडीने दोषारोप पत्र दाखल केले होते.
पीडित महिलेल्या दिली होती 20 लाखांची मदत - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या 30 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक करण्यात आली होती. महिलेवर बलात्कार करून आरोपींचे तिथून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून आरोपीला पकडण्यात आले होते. या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांवर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात अनेक आरोप देखील करण्यात आले होते. राष्ट्रीय महिला आयोगापासून या सर्व प्रकरणावर सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. तसेच राज्य सरकारवर टीका देखील करण्यात आली होती. राज्य सरकारकडून पीडित महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींना 20 लाखांची मदत देण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरला मध्यरात्री घडली होती.आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला गेला होता. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु होता. साकीनाका खैरानी रोड येथे तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला होता.