महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Nirbhaya Case : मृत्यूशी झुंज अपयशी, पीडितेचा मृत्यू; वाचा घटनाक्रम... - mumbai crime news

या घटनेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. याप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशीही बोलणे झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

mumbai nirbhaya victim death
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Sep 11, 2021, 5:04 PM IST

मुंबई - साकीनाका येथील खैरानी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले आहे. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. याप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशीही बोलणे झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

अति रक्तस्त्रावामुळे मृत्यू - पेडणेकर

९ तारखेला महिलेला राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी महिला अत्यवस्थ होती. प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. अडीच ते ३ तास शस्त्रक्रिया चालली. मात्र डॉक्टर या महिलेला वाचवू शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, १० ते १२ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात भांडण सुरू होते. आरोपी व्यक्ती संबंधित महिलेला मारहाण करीत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशीही मारहाण करण्यात आली. स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरोपीला कठोर शासन - वळसे पाटील

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस खात्याला सूचना दिल्या आहेत, की या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ते शोधा म्हणून. वेळोवेळी या प्रकरणाची सर्व माहिती घेत आहे', असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

घटना मन सुन्न करणारी - फडणवीस

ही मन सुन्न करणारी आहे. मुंबई शहराचा लौकिक हा सुरक्षित शहर म्हणून केला जातो. मुंबईत रात्री-अपरात्री महिला, मुली स्वतःला सुरक्षित समजत असतात. मात्र वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे या लौकिकेला तडा जात असल्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच साकीनाका बलात्कार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. कोर्टात या आरोपींना शिक्षा करेलच. मात्र या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल - रेड्डी

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

घटनाक्रम - (9 ते 11 सप्टेंबर)

  • - ९ सप्टेंबरच्या रात्री ३.२० मिनिटांच्या दरम्यान साकीनाका येथील फॅक्टरीमधील वॉचमनने कंट्रोल रूममध्ये कॉल करून महिलेला मारहाण सुरू आहे, असे सांगितले.
  • - पोलीस १० मिनिटांत घटनास्थळी दाखल.
  • - पोलिसांना एक महिला गंभीर जखमी अवस्थेत एका टेम्पोत सापडली. पोलिसांनी विलंब न करता तो टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात नेला आणि तिला दाखल केले.
  • - पोलीस तपास सुरू. आरोपी मोहन चौहानला अटक.
  • - आरोपी चौहान जौनपूर(उत्तर प्रदेश)चा राहिवासी
  • - आरोपीची 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
  • - याप्रकरणात एसीपी ज्योत्स्ना रासंम यांची नियुक्ती तसेच एक स्पेशल टीम बनवली आहे, ज्याचे त्या नेतृत्व करतील
  • - 11 सप्टेंबर - उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू, त्यामुळे या गुन्ह्यात ३०२चेही कलम लागू
  • - आधी एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता होती, परंतु आतापर्यंत झालेल्या तपासात एक आरोपी असल्याचे निष्पन्न
  • - गुन्ह्याचे कारण आणि गुन्हा कसा घडला हे अजूनही अस्पष्ट
  • - तपास लवकरात लवकर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणार - हेमंत नगराळे
  • - प्रसार माध्यमांना विनंती, की कृपया असे कोणतेही फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नये, जेणेकरून पोलीस तपास प्रभावित होतील.
  • - आरोपी ड्रायव्हर, कचरा वेचणारा आहे. तो रस्त्यावर राहत असे. त्याच परिसरात आरोपीचे नातेवाईक राहत होते. त्याच्या नातेवाईकांनी आरोपीला घराबाहेर काढलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details