मुंबई -शहरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार होत असताना महिलांना प्रसूतीवेळी कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू नये, त्यांची सुखरूप प्रसूती व्हावी म्हणून पालिकेने नायर रुग्णालयात कोरोना झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष कक्ष सुरु केला. या कक्षात जन्म घेणाऱ्या बालकांनी नुकताच एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. नायर रुग्णालयात आतापर्यंत कोविडबाधित मातांनी १०२२ बालकांना जन्म दिला असून त्यात एका तिळ्याचा, १९ जुळ्यांचा त्यात समावेश आहे.
एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा जन्म
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार होत असताना एप्रिल २०२०मध्ये नायर रुग्णालय 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित करण्यात आले. या रुग्णालयात १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविड बाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात १००१ कोविड बाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा समावेश असून यानुसार एकूण १०२२ बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे. मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी 'पीपीई किट' घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविरत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचा-यांनी 'पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकदा अनेक दिवस घरी न जाता रुग्णालयात राहून अथकपणे व अविरतपणे रुग्णसेवेचे काम करीत आहेत. गेले वर्षभर सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. पुनम वाडे, डॉ. संतोष कोंडेकर, डॉ. विशाल सावंत, डॉ. किरण राजपूत आणि परिचारिका सिस्टर सीमा चव्हाण, सिस्टर रोझलीन डिसूजा, सिस्टर अनाया साटम यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. अरुंधती तिलवे, डॉ. चैतन्य गायकवाड, डॉ. अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नायर रुग्णालयातील कोविड विषयक सर्व समन्वयन हे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. यानिमित्ताने रुग्णालयाचे संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी तिन्ही विभागातील सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्या मेहनतीचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कोविड विषयक समन्वयक डॉक्टर सारिका पाटील आणि डॉक्टर सुरभी राठी यांच्याही अविश्रांत प्रयत्नांचे कौतुक करीत त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.