मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सचिन वाझे प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे. वाझेला पोलिस खात्यात सुपर कॉप व्हायचे होते. तसेच, वाझेच्या घरातून 65 बुलेट्सही मिळाल्या आहेत, असा खुलासा एनआयएने केला आहे.
वाझेला पोलीस खात्यात व्हायचे होते सुपर कॉप -
सचिन वाझेला 17 वर्षानंतर मुंबई पोलीस खात्यात पुन्हा सामावून घेण्यात आले. यानंतर पोलिस खात्यात वाझेला आपलं वजन वाढवायचे होते. शिवाय, त्याला रातोरात सुपर कॉप बनायचे होते. त्यामुळे मी स्वतः उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओत जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवले होते, अशी कबुली सचिन वाझेने दिली आहे. याचा खुलासा एनआयएने केला आहे.
वाझेच्या घरात मिळाले बेहिशेबी 65 बुलेट्स -
राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 'सचिन वाझेच्या घरात छापा मारला. या तपासात 65 बुलेट्स सचिन वाझेंच्या घरात मिळाल्या. या 65 बुलेट्सचा हिशोब वाझे देण्यात अपयशी ठरलेला आहे. वाझेकडे असलेल्या सरकारी रिव्हॉल्वरच्या पाच गोळ्या पोलीस खात्यात नोंद आहेत. पण, 65 बुलेट्सचा वापर तो कशासाठी करत होता? याचे उत्तर देऊ शकलेला नाही'. दरम्यान, एनआयएने एटीएसच्या ताब्यातून नरेश गोर व विनायक शिंदे या दोन आरोपींना घेतले आहे. त्यांना वाझेच्या समोर बसवून हिरेन मनसुखची हत्या का केली? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.