महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनआयएने केलेली अटक फक्त संशयाच्या आधारावर, सचिन वाझे यांच्या वकिलांचा दावा

"एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही" असा युक्तिवाद वाझेंच्या वकिलांनी कोर्टात केला.

एनआयएने केलेली अटक फक्त संशयाच्या आधारावर, सचिन वझे यांच्या वकिलांचा दावा
एनआयएने केलेली अटक फक्त संशयाच्या आधारावर, सचिन वझे यांच्या वकिलांचा दावा

By

Published : Mar 15, 2021, 7:30 AM IST

Updated : Mar 15, 2021, 9:25 AM IST

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझेंना केंद्रीय तपास यंत्रणेने(NIA) फक्त संशयाच्या आधारे अटक केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. त्यांच्या रिमांडमध्ये आरोपीविरोधात काहीही पुरावा नसल्याचे वाझेंच्या वकिलांनी म्हटले आहे.

एनआयएचा युक्तिवाद

सचिन वाझेंना अटक केल्यानंतर त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. NIA ने परिस्थितीजन्य पुरावे कोर्टात सादर केले. NIA ने म्हटलं, की "वाझे यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची आहे, कारण या प्रकरणाचा तपास अजूनही प्राथमिक स्तरावर आहे. यात चेन ब्रेक करायची आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. यात इतर लोकं सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे."

सचिन वाझेंच्या वकिलांचा युक्तिवाद
वाझे यांच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडताना त्यांच्याविरोधात कसलाही पुरावा नसल्याचा दावा केला. "एनआयएने फक्त संशयाच्या आधारावर त्यांना अटक केली आहे, त्यांच्या रिमांडमध्ये आरोपी विरोधात काही पुरावा नाही" असा युक्तिवाद वाझेंच्या वकिलांनी कोर्टात केला.

12 तास चौकशीनंतर एनआयएकडून अटक

एनआयएने शनिवारी 13 मार्च रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास 12 तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 286, 465, 473, 506 (2), 120 ब आणि 4 (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

अटकपूर्व जामिनासाठी वाझेंचा सत्र न्यायालयात अर्ज

व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून अटकेची शक्यता बघता वाझेंनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती. मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत एटीएसने या अर्जास विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर एनआयएने वाझेंचा जबाब नोंदविला.

हेही वाचा -सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी

Last Updated : Mar 15, 2021, 9:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details