मुंबई : अँटिलिया प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. वाझेंना पोलीस दलातून बडतर्फ करण्याची तयारी करण्यात आली असून घटनेतील कलम 311 (2) ( b )नुसार त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस खात्याकडून गृह विभागाला सचिन वाझे व परमबीर सिंग यांच्याविषयीचा अहवाल पाठविण्यात आला होता. मुंबई पोलीस खात्याची प्रतिमा एखाद्या अधिकाऱ्यामुळे खराब होत असेल, तर त्याला खात्यातून बडतर्फ करण्याचा अधिकार मुंबई पोलीस आयुक्तांना घटनेच्या विशिष्ट कलमानुसार आहे.
वाझे आधीही होते निलंबित
2012 घाटकोपर बॉम्बस्फोटासंदर्भातील मुख्य आरोपी ख्वाजा युनूस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी तब्बल 17 वर्षे सचिन वाझे पोलीस खात्यातून निलंबित होते. जून 2020 मध्ये त्यांना पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यात सामावून घेण्यात आले होते. मात्र 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलीस खात्यातून त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले होते. मात्र आता सचिन वाझेंना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याची तयारी करण्यात आली आहे.
यापूर्वीही झाली आहे कारवाई
मुंबई पोलीस खात्यात अशा प्रकारची बडतर्फीची कारवाई यापूर्वीही झाली आहे. यापूर्वी देवणार पोलीस ठाण्यात दत्ता चौधरी या पोलीस निरीक्षकाला लाच घेण्याच्या गुन्ह्याखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. याशिवाय मुंबई पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव या अधिकाऱ्यावर एका लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यास बडतर्फ करण्यात आले होते.