मुंबई- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या सभागृहात माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस अधिकारी सचिन वझे यांची पोलीस नियंत्रण कक्षाच्या विभागात बदली करण्यात आली आहे.
मुंकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी आढळळी होती. त्या स्कार्पिओचा कथित मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सभागृहात सचिन वझे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला. तसेच सचिन वझे यांची बदली करण्याचे जाहीर केले होते.
तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली बदली -
सभागृहात माहिती दिल्या प्रमाणे सचिन वझे यांची बदली करण्यात आली आहे. वझे यांना गुन्हे शाखेतून हटवून नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. मात्र, वझे यांची ही बदली तात्पुरत्या स्वरुपाची आहे.
मनसुख हिरे मृत्यू प्रकरणाचा तपास होईपर्यंत वझे यांची या विभागात बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.