मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यूवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप केले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे. सचिन वझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? टार्गेट करण्याची प्रवृत्ती सोडा असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आधी फाशी आणि मग तपास पद्धत बरी नाही -
मुंबईत स्फोटके सापडली होती, त्याचाही तपास सुरू आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा ही पद्धत बरी नाही. सध्या ही पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. सर्व तक्रारींची दखल आम्ही घेत आहोत. नवीन पद्धत आली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याचे धिंडवडे काढायचं. हे चुकीचे आहे.
सचिन वझे आमचा नेता किंवा मंत्री नाही -
सचिन वझे कधीतरी शिवसेनेत होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काहीच संबधं नाही. सचिन वझे आमचा कोणी नेता किंवा मंत्री नव्हता. मृत्यू झाल्यानंतर त्याची दखल घेणे हे सरकारचे काम आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तपास सुरू आहे. एखाद्याला फाशी देऊन चौकशी करण्यापेक्षा आधी चौकशी करू आणि मग फाशी देऊ.
विरोधकांना कायदा बदलायचा आहे का...?' असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
म्हणून वझेना पदावरून हटवले -
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सचिन वझे यांना क्राईम ब्रँच काढून दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी केली. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी वझेना बाजूला केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका सकाळी विरोधीपक्ष नेत्यांनी मांडली. त्याचमुळे आज शेवटचा दिवस होता म्हणून कामकाज चालवण्यासाठी वझेना बाजूला करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मृत्यू झाल्यानंतर सरकारचे काम आहे, त्यामुळे मोहन डेलकर यांनी देखील आत्महत्या केल्यानंतर काही जणांची नावे समोर आली आहेत. तपासाला दिशा देण्याचे काम करू नये. टार्गेट करून तपास करा असं होतं नाही, आधी तपास झाला पाहिजे. हिरेन यांच्या मृत्यूची आम्ही दाखल घेतली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.