मुंबई -मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची शरद पवारांकडून कामकाजासंदर्भातची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीनंतर राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार, जयंत पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या नेत्यांची बैठक झाली असून मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि या प्रकरणात सचिन वाझे यांचा असलेला हस्तक्षेप या विषयावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांचे थेट शिवसेनेशी संबंध असल्याने विरोधक महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत असून, सचिन वाझे यांना पाठिशी घातल जातं असल्याचा आरोप त्यांच्याकडून होतोय. तसेच या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यावरही प्रश्न उपास्थित केले जात आहेत. यावर देखील बैठकीत चर्चा झाली. सचिन वाझे प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष याबाबत सहमत असल्याचं बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच तिन्ही पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या असून या प्रकरणाची कोणाचाही संबंध असेल त्याला पश्चाताप हा करावाच लागेल, असा इशाराही जयंत पाटील यांच्या मार्फत देण्यात आला आहे.
जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना हे ही वाचा - मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, राज्यातील मंत्रिमंडळात जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार चार महिन्यातून एकदा बैठक बोलावतात. ही बैठकही त्यापैकीच एक होती. मंत्रिमंडळ बदलाबाबत कोणतीही चर्चा आज झालेली नाही. अंबानी यांच्या घराच्या बाहेर जी स्फोटके सापडली त्याचा तपास एनआयए करत आहे तर मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही. शिवसेनेकडून देखील असा प्रयत्न केला जात नाही. गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहात देखील मांडली होती. वेळोवेळी ते माहिती देत होते.
अधिकाऱ्यांचा कोणत्या प्रकरणात सहभाग असेल तर त्याची चौकशी तपास यंत्रणा करतात आणि ते त्यांचा तपास करत आहेत. मनसुख हिरेन प्रकरणाचा सीडीआर विरोधकांकडे असेल तर त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावे. वाहन कोणी ठेवलं याचा तपास एटीएस देखील करत आहे. सचिन वाझे यांच्या निलंबनाला उशीर झाला असं नाही. या प्रकरणात कोणाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न नाही. शिवसेनेमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे असं काही नाही.
हे ही वाचा - औरंगाबाद: हॉटेलमध्ये बसून जेवण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रपती राजवट लावण्याच्या बाबतीत काही नियम आहेत. तपास यंत्रणा काम करतायत ते काम पूर्ण झालं की जे काही असेल ते पुढे येईल. जे काही समोर येईल त्यावर योग्य कारवाई केली जाईल. या प्रकरणात राजकीय भाष्य करणं योग्य नाही.
वरूण सरदेसाई यांच्यावर नितेश राणेंकडून आरोप -
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सचिन वाजे यांना NIA ने अटक केल्या नंतर या प्रकरणात नवीन पुरावे सादर करण्यात आले. यामध्ये स्कॉर्पिओ कार सोबत असलेली इनोवा कार पोलिसांची असल्याचे संकेत एन आय ए ने दिल. तसेच विरोधी पक्षाकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला त्या नंतर राजकीय वातावरण तापू लागलेय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरून सरदेसाई यांची या बाबत भूमिका काय? त्यांचे कॉल रिकोर्ड तपासले जावेत अशी मागणी केली आहे. वरून सरदेसाई हे मुख्यमंत्री यांचे जवळचे नातेवाईक असल्याने आता थेट मुख्यमंत्री यांच्यावर आरोप केले जाण्यासारखी परिस्थिती उद्भवली आल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.